स्वामीलीला 2 …….!! श्री स्वामी समर्थ !!
स्वामीलीला…….!!
श्री स्वामी समर्थ !!
मंगळवेढ्यास एक तंतूकार(साळी) दरिद्री माणूस राहत होता. भिक्षा मागून उदरनिर्वाह करी. असाच फिरत असताना एक
दिवस सुदैवाने त्याची आणि स्वामींची भेट घडली.
श्री समर्थांच्या कृपे बद्दल त्याला ऐकून माहीत होते. पण प्रत्यक्ष भेटी नंतर तो स्वामीमय
झाला. तो एकनिष्ठपणे महाराजांची सेवा करू लागला. त्याच्या त्या सेवेला तीन महिने उलटून
गेले. श्रींना त्याची दया आली. एके दिवशी रात्री तंतूकाराचे स्वप्नात महाराजांनी दर्शन
देऊन सांगितले की,"तुझे वडील पूर्वीमोठे व्यापारी होते पंढरपुरास यात्रेस गेले
असताना ते तिकडेच मरण पावले, तुझी आई त्यांच्या अगोदरच मृत्यू पावली. तुझ्या घराच्या
समोर तुळशीवृंदावना खाली तुझ्या वडिलांनी पुष्कळ द्रव्य पुरून ठेवले आहे, ते तू काढून
घे!" असा चमत्कारीक दृष्टांत पाहून तो तंतूकार जागा झाला.
श्रींच्या आज्ञेप्रमाणे
घरी जाऊन तुळशीवृंदावनाच्या खाली खणल्यावर तंतुकराला भरपूर धन सापडते. तंतुकाराला अत्यानंद
होतो आणि तो धावत जाऊन स्वामींना शोधू लागतो, त्याला स्वामी जंगलात ध्यानस्थ बसलेले दिसतात. आपल्या
आनंदाश्रूंनी तो स्वामींच्या पायांना अभिषेक करतो आणि आशीर्वाद घेऊन पुढे तो आनंदाने
संसार करू लागतो. पुढे हा तंतूकार मोहोळास येऊन राहतो. स्वामी सेवेत उर्वरित आयुष्य
काढतो. अशी ही श्री स्वामींची लीला अगाध आहे.
रामदासी बुवांची
गोष्ट......
श्री स्वामी समर्थ
सतत एका गावातून दुसऱ्या गावात फिरत असत. एका जागी बसणे हा त्यांचा स्वभाव नव्हता. आणि
सतत भटकंती करण्या पासून त्यांना कोणी अडवू पण शकत नव्हते. ते मंगळवेढ्यास असताना पंढरपूर, बेगमपूर, चलांबे अशा जवळच्या गावी येत जात असत. चलांबे हा गाव पटवर्धनांचा आहे. एके
दिवशी श्री स्वामी समर्थांची स्वारी चलांबे गावी रामदासी बुवा यांच्या मठात गेली. रामदासी बुवांनी आदरातिथ्य करून त्यांना भोजन दिले. स्वामींनी भोजन
केले आणि तेथेच मठात ते झोपी गेले आणि काही केल्या उठेना...... आज स्वामींना रामदासी
बुवांची गंमत करायची होती.
बुवांना कामानिमित्त बाहेर जायचे होते. मठ उघडा ठेवून आणि
स्वामींना एकटे ठेवून कसे जायचे, म्हणून त्यांनी एक युक्ती केली, स्वामींना मठात बंद
करून दरवाजाला बाहेरून कुलूप लावून ते आपल्या कामासाठी निघून गेले. कामाचा व्याप मोठा
असल्याकारणाने बुवांना तेथेच संध्याकाळ झाली. त्यांच्या कानी एक वार्ता आली की, श्री
स्वामी समर्थ भीमा नदीच्या वाळवंटात लहान मुलांसोबत खेळताहेत. बुवांना त्यावर विश्वास
बसला नाही त्यांना वाटले की ते कोणीतरी दुसरे महापुरुष असतील. कारण रामदासी बुवा स्वतः
स्वामी समर्थांना मठात निद्रिस्त अवस्थेत ठेवून दरवाज्याला कुलूप लावून कामानिमित्त
बाहेर आले होते.
कुतुहलापोटी रामदासी बुवांनी लगबगीने येऊन मठ खोलून पाहिले आणि त्यांना खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसला.
कारण तिथे स्वामी समर्थ नव्हते. स्वामी समर्थांच्या या लीलेने ते भारावून गेले होते. कारण
मठाला दुसरा कुठलाही बाहेर जाण्याचा मार्ग नव्हता. मग स्वामी बाहेर गेले कसे. ते कळून चुकले होते कि कोणीही आणि कसेही स्वामींना
बंधनात ठेऊ शकत नाही. आणि भीमानदीच्या वाळवंटात खेळत असणारे दुसरे तिसरे कोणी नसून खुद्द
स्वामी आहेत. रामदासी बुवा तसेच धावत भिमेकाठी गेले आणि मोठ्या भक्तिभावाने स्वामींना
परत मठात घेऊन आले.
!! श्री स्वामी समर्थ !!
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा