श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाबद्दल माहिती

                               !! श्री स्वामी समर्थ !!
      श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाबद्दल माहिती
           नमस्कार मित्र-मैत्रिणींनो आज मी तुम्हाला मला समजलेली श्री स्वामींच्या प्रकट दिना बद्दलची माहिती सांगणार आहे.
स्वामिसुत नावाचे त्यांचे एक महान भक्त होऊन गेले. त्यांना स्वामी समर्थ आपला मुलगा मानायचे. आणि याच भक्ताच्या अनुभवावरून आपल्याला समजले की स्वामी समर्थ कसे प्रकट झाले, तो पर्यंत स्वामी समर्थ कुठून आले, ते कोण होते ,ते कधी आले याबद्दल कोणालाही माहिती नव्हती. आज मी याच स्वामीसुतांच्या  लिखाणानुसार स्वामी प्रकट दिनाची काही माहिती सांगणार आहे.
          शेकडो वर्षापूर्वी पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून बारा कोस छेलीं खेडा नावाचे एक गाव होते. त्या ठिकाणी विजयसिंह नावाचा एक लहान मुलगा आपल्या भाऊ आणि भावजय बरोबर राहायचा . विजयसिंहला कोणीही मित्रमंडळी नव्हते त्यामुळे तो कोणाशीही खेळायचा नाही. त्याच्या घरापासून थोड्या अंतरावर असणाऱ्या पडीक जागेत एक विस्तीर्ण पसरलेले फार  जुने  वडाचे झाड होते. त्यात एक छोटीशी देवळी होती. देवळीत एक सुंदर गणपतीची मूर्ती होती. विजयसिंह नेहमी खिशात गोट्या घेऊन देवळी पाशी जायचा आणि त्या गणपतीच्या मूर्तीबरोबर खेळायचा. गणपतीला आपला मित्र मानून त्याचाही डाव स्वतः खेळायचा. हा त्याचा रोजचा दिनक्रम झाला होता. विजयसिंह चा हा साधाभोळा भक्तिभाव पाहून, त्या मुलाला कारण बनून परमात्म्याला  जग उद्धारासाठी अवतरावेसे  वाटले तो दिवस होता चैत्र शुद्ध द्वितीया.
         एक दिवस विजयसिह नेहमीप्रमाणे गणपती देवळी  कडे खेळायला गेला. त्या मुलाच्या बालमनाने त्या दिवशी अचानक वेगळाच हट्ट धरला त्याने सर्व गोट्या गणपतीसमोर टाकल्या आणि गणपतीला उद्देशून म्हणू लागला की " बाप्पा रोज मी तुझा डाव खेळतो पण आज नाही, आज तू स्वतः माझ्याशी खेळायचे"बस इतकेच शब्द त्याच्या तोंडातून निघताच धरणीकंप  होऊ लागली ,सर्वत्र ढग जमू लागले, अंधार होऊ लागला, वारे वेगाने वाहू लागले. हा सगळा प्रकार बघून तो लहान विजयसिंह घाबरला .आता पुढे काय होणार याची पुसटशीही कल्पना त्या मुलाला नव्हती.आज ती अद्भुत शक्ती सदेह अवतरणार होती आणि  तीच्या आगमनाची ही  पूर्वसूचना होती. ज्या ठिकाणी गणेश मूर्ती होती त्या ठिकाणी धरणी दुभंगून एक आठ ते दहा वर्षाची अतिशय तेजस्वी अशी बालमूर्ती प्रकटली आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून प्रत्यक्ष परब्रम्ह श्री स्वामी समर्थ महाराज होते. त्यादिवशी साक्षात स्वामी समर्थ विजयसिंह बरोबर गोट्या खेळले. खेळताना स्वामींनी विजयसिंहला हरवल,.नंतर त्या बालरूप स्वामींनी त्या गोट्या विजय सिंगला उधार दिल्या आणि परत भेटण्याचे वचन देऊन तिथून ते गुप्त झाले.

थोडक्यात स्वामींचा अवतार हा पंजाब प्रांतात हस्तिनापुर पासून बारा कोस अंतरावर छेला खेडा नावाच्या गावात वटवृक्षाच्या जवळ गणेश मुर्ती च्या शेजारी झाला.

            आता प्रश्न असा उरतो की हे कसे समजले. तर त्या गोष्टीचा उलगडा असा झाला की कोकणातील हरिभाऊ ( स्वामिसुत) हे अक्कलकोटला आले होते आपल्या व्यवसायिक प्रश्नांची पूर्तता करण्यासाठी ते स्वामी सेवेसाठी गेले असता तिथे ते वास्तव्यास राहिले.एक दिवस स्वामी सेवा चालू असताना स्वामींनी हरिभाऊंना जवळ बोलावले आणि त्यांना प्रेमाने म्हणाले की आज पासून तू माझा सुत झालास. सर्व घरदार सोडून दे आणि दर्या किनारी माझी ध्वजा  उभी कर हे ऐकून हरिभाऊंना रडू कोसळले. कारण ते स्वामींकडे इच्छापूर्तीसाठी आले होते. आणि स्वामींनी त्यांना सर्व प्रपंच सोडण्याची आज्ञा केली होती.हरिभाऊंना निराश बघून स्वामी त्यांना म्हणाले की " रडतोस का ? माझे पोट बघ किती मोठे आहे त्याच्यावर हात फिरव बघू ". आणि त्यावेळी हरिभाऊंनी तसे केले त्यांना ध्यान लागले.आणि त्या ध्यान अवस्थेत त्यांना आपले सगळे जन्म आठवू लागले त्यात त्यांना विजयसिंह चाही जन्म आठवला आणि त्यानंतर या सर्व गोष्टींचा उलगडा झाला. आणि या गोष्टीला स्वतः स्वामिनी मान्यता दिली आहे ती पुढील प्रमाणे............
            स्वामी प्रकट दिनाचा उत्सव स्वामिसुत महाराजांनी सुरू केला आहे. ज्यावेळी स्वामिसुत महाराज हा उत्सव अक्कलकोटमध्ये करत होते तेव्हा भुजंगा सारख्या भक्तांनी स्वामींना प्रश्न विचारला कि स्वामिसुत हे काय करत आहेत? त्यावेळी स्वामींचे उत्तर असे होते की " माझा बाळ मी सदेह ज्या दिवशी प्रकट झालो  त्या तिथीनुसार उत्सव करत आहे".
            नाना रेखी नावाचे अहमदनगरचे स्वामीभक्त होते ते स्वामी सुतांच्या सांगण्यावरून अक्कलकोटला आले होते. ते पिंगला ज्योतिष विद्येत पारंगत होते. स्वामिनी त्यांना आज्ञा केली की माझी कुंडली बनव तेव्हा नानांना खूप आनंद झाला. त्यांनी कुंडली बनवण्याचे काम सुरू केले.काही दिवसांनी कुंडली बनली आणि त्यात स्वामी प्रकट होण्याचा  मजकूर वर प्रमाणे होता. नाना कुंडली घेऊन स्वामीं पाशी आले तेव्हा तिथे भजनाचा कार्यक्रम सुरू होता..स्वामिनी ती कुंडली नाना कडून घेऊन आपल्या एका भक्ताद्वारे माळ्यावर टाकायला सांगितली भजनाचा कार्यक्रम संपला तसा स्वामिनी ती कुंडली परत काढायला सांगितली तेव्हा त्या कुंडलीवर हळद-कुंकू ,अक्षता, तुळस, फुले, वगैरे वाहिलेले होते. सर्व देवी देवता नि त्या कुंडली ची पूजा केली होती.
          कुंडली पाहून स्वामी खूप खुश झाले आणि नानांचा उजवा हात हातात घेऊन ठेवला. नानांचा हात सोडल्यावर नानांच्या हातावर विष्णुपद उमटले होते.स्वामींचे आत्मलिंग आणि विष्णुपद नानां जिवंत असेपर्यंत त्यांच्या हातावर होते याचा अर्थ स्वामिनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरीत्या स्वामीसुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकट दिनालाच मान्यता दिली होती. आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखी च्या हातावर विष्णुपद उमटले आणि आजही स्वामींची ती कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. स्वामी समर्थ महाराज कर्दळीवनात योग्यांना मार्गदर्शन करायला येण्यापूर्वी देशात वेगवेगळ्या ठिकाणी स्वतःचे खरे नाव ,ओळख लपवून चंचल भारती , दिगंबर बुवा अशा नावाने सुद्धा कार्यरत होते............................श्री स्वामी समर्थ

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्वामीनिष्ठा ........!! श्री स्वामी समर्थ !!