ब्रम्हांडनायक....श्री स्वामी समर्थांचे वर्णन.
!! श्री स्वामी समर्थ !!
ब्रम्हांडनायक....श्री स्वामी समर्थांचे वर्णन
खरं तर कोणा
महान परमात्म्याचे वर्णन करणे हे जरा आपल्यासारख्या साधारण माणसाला
कठीण जाते. कारण वर्णन हे नुसते बाह्यरूप नसते तर ते आंतर रूपी ही असते, आणि इथे तर
आपण परब्रम्ह श्री सद्गुरु स्वामींचे वर्णन जाणून घेणार आहोत. स्वामी कसे होते, त्यांना
काय आवडायचे, त्यांचे वागणे कसे होते, हे थोडक्यात
पाहणार आहोत.
स्वामी समर्थ म्हणजे तेजपुंज मूर्ती जणू, गौरवर्ण धिप्पाट
शरिरयष्टी, त्यांचे खांदे रुंद असून विशाल उदर होते. त्यांची नजर खूप तीक्ष्ण होती
जणू काही त्या नजरेत एकाच क्षणात भक्तांनी न बोलता मांडलेले त्यांचे प्रश्न जाणून घेत
असत. पांढर्याशुभ्र भुवया, त्यांचे कान मंगलमूर्ती सारखे मोठे होते, जसे काही सर्व
भक्तांचे सांगणे ऐकण्यासाठी असावेत. स्वामी फार कमी बोलत, तर कधी
कधी उगाचच बडबडत असत. त्यांचे बोलणे नेहमी मराठी किंवा हिंदीत असे. हसताना पोटावर हात
धरुन हसत त्यांचा तो आवाज पुऱ्या आसमंतात घुमत असे. त्यांच्या कपाळी चंदनाचा भव्य टिळा
असे गळ्यात रुद्राक्षांची माळा नेहमी असायची. गुलाबांच्या पाकळ्याहूनही नाजूक त्यांची
नखे होती. त्यांचे शरीर एवढे कोमल आणि नाजूक होते की त्यात हाडे आहेत की नाहीत हेही
समजत नसेल. त्यांची पावले म्हणजे लोणीच जणू. मनात आले की अनवाणी चिखलात, काट्यात ,कचऱ्यात
फिरत असत.पण त्या मऊशार पावलांना कधीही चिखल किंवा कुठलीही इजा झालेली नसे. त्यांचे पोट मात्र गोल डेऱ्या सारखे जणूकाही
सारं विश्वच त्यात सामावले आहे. स्वामींची त्वचा नितळ आणि कोमल होती.
श्री स्वामी
समर्थ मनाचे राजे होते, कित्येक दिवस आंघोळ करत नसत. तर कधीकधी दिवसातून चार-पाच
वेळा आंघोळ करायचे. असे असूनही स्वामींच्या शरीरातून सदैव धुपाचा सुगंध दरवळत असे.
स्वामीं मध्ये जणू जग सामावले होते. कधी ते बागेत असत तर कधी मसन वटीत, कधी ते राजवाड्यात, कधी मठात तर कधी मंदिरात. "
शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानीशंकर शिवशंकर शंभो."
हा मंत्र सदै व त्यांच्या मुखात असे. स्वामी समर्थ मुलांसोबत गोटया खेळत तर कधी लपाछपी
खेळत त्यांना प्राणीही खूप आवडत स्वामींना गोड खायला अतिशय आवडे. यामध्ये कधी खीर, मसाले दूध, असे तर कधी पन्हे. स्वामींच्या तऱ्हाच निराळ्या होत्या ते कित्येक दिवस जेवत नसत अगदी पाणीसुद्धा
घेत नसत. तर कधी कधी त्यांना इतकी भूक लागे की भरपूर खात असत. स्वामी नेहमी जेवायला
बाहेर बसत असत. ते जेवत असताना त्यांच्यासोबत त्यांच्या ताटात गाई, कुत्रे येऊन जेवत
असत. स्वामी स्वतः त्या मुक्या प्राण्यांना घास भरवत.
श्री दत्तगुरूंनी स्वामींचा अवतार हा फक्त जनकल्याणासाठी
घेतला होता. जो भक्त सगुण उपासना करतो म्हणजेच
ज्या उपासनेत कसला स्वार्थ नाही फक्त समर्पण आणि स्वामी भेटीची आर्तता आहे. ज्या भक्तांमध्ये
दया भावना आहे. गरिबांना दान करण्याची वृत्ती आहे. सदैव कुठल्याही परिस्थितीत आणि
कुठल्याही अवस्थेत नामस्मरणा ची ओढ आहे. जो भक्त आपल्या निर्मळ आणि मधुर वाणीने इतर
लोकांना जोडून ठेवतो त्यांना भक्तीचा मार्ग
दाखवतो. आपल्यावर आलेल्या संकटात वाईट परिस्थितीत आणि चांगल्या परिस्थितीतही जो समाधानी
असतो जो फक्त आपल्या गुरुवर विश्वास ठेवून आपले आयुष्य जगतो, चांगल्या मार्गाने प्रगती
करत असतो तो भक्त नेहमी गुरु प्रेमाला पात्र ठरतो.
गुरु हे नेहमी जग उद्धारासाठी अवतार
घेत असतात. सारे विश्व जणू गोटिच्या स्वरूपात श्री स्वामी समर्थांनी हातात धरुन ठेवले आहे. अश्या या गुरुमाऊलीला कोटी कोटी प्रणाम.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा